022-24713283 / 24709558 mahabms55@gmail.com
भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश

आपले आराध्य दैवत — श्री विश्वकर्मा

मुख्यपृष्ठ  ›  आपले आराध्य दैवत
भारतीय मजदूर संघाची मागणी

१७ सप्टेंबर — आद्य श्रमिक भगवान विश्वकर्मा जयंती

भारताचा श्रमिक दिन घोषित करा

१७
सप्टेंबर
विश्वकर्मा जयंती

१७ सप्टेंबर रोजी देशातील सर्व कामगार आद्य श्रमिक भगवान विश्वकर्मा जयंती भक्तिभावाने व श्रद्धेने साजरी करत असताना, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना या योजनेचा शुभारंभ केला. महाराष्ट्र सरकारने गुणवंत कामगार पुरस्काराला विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार असे नाव दिले आहे. बांधकाम कामगारांसाठी चालवल्या जाणाऱ्या फिरत्या रुग्णवाहिकांना विश्वकर्मा रुग्णवाहिका असे नाव दिले. महाराष्ट्र सरकारने कामगार विभागाच्या सर्व कार्यालयांत विश्वकर्मा जयंती साजरी करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. या योजनांना सरकारने ‘विश्वकर्मा’ हे नाव का दिले? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

विश्वकर्म्याचे महत्त्व

विश्वकर्मा म्हणजे देवांचा शिल्पी. विश्वकर्म्याचा उल्लेख महाभारत, रामायण, स्कंदपुराण, भागवत यांसह वेद-उपनिषदे आदी प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. विश्वकर्म्याने इंद्राची नगरी अमरावती, श्रीकृष्णाची नगरी द्वारका, अलंकापुरी, रावणाची लंका, पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर आदी नगरांचे निर्माण केले आहे. तसेच रामायणातील पुष्पक विमान व विविध अस्त्रांची निर्मिती विश्वकर्म्याने केलेली आहे.

आपल्या देशातील स्वयंरोजगार करणारे सुतार, सोनार, कुंभार, मूर्तिकार, चांभार, लोहार, बोटी बनवणारे, मातीची खेळणी बनवणारे, शिंपी इत्यादी परंपरेने कुशल व हुशार असलेल्या कारागिरांना विश्वकर्मा असे म्हटले जाते. या सर्व ज्ञाती भगवान विश्वकर्म्याला आपला पूर्वज मानतात. त्यांची जयंती संपूर्ण भारतीय समाज हजारो वर्षांपासून भक्तिभावाने साजरी करतो. परंतु केवळ त्यामुळेच भारतीय समाज त्यांची जयंती साजरी करतो का? नाही. त्यासंबंधीची पुराणातील कथा महत्त्वाची आहे.

विश्वकर्म्याचा समाजहितासाठी त्याग

विश्वकर्म्याचा पुत्र वृत्रासुर अत्यंत शूर व पराक्रमी होता. त्याने भगवान शंकराची आराधना करून अमर राहण्याची शक्ती मिळवली. शंकराने त्याला एक वर दिला. त्या शक्तीचा वापर तो समाजहिताऐवजी समाजाला त्रास देण्यासाठी करू लागला. त्रास इतका वाढला की, समाजाला आपले जीवन जगणे कठीण झाले आणि समाजहितासाठी त्याचा वध करण्याची आवश्यकता निर्माण झाली. मात्र त्याचा वध करणार कसा?

भगवान शंकरांनी दिलेल्या वरानुसार तपस्वी ऋषींच्या अस्थींपासून बनवलेल्या एका शस्त्राद्वारेच ते शक्य होते. त्यासाठी दधीची ऋषींनी आपला देहत्याग केला. त्यांच्या अस्थींपासून विश्वकर्म्याने अस्त्र बनवले. त्या अस्त्राने देवांचा राजा इंद्राने वृत्रासुराचा वध केला. अशा प्रकारे विश्वकर्म्याने समाजहितासाठी आपल्या पुत्राचे बलिदान दिले. विश्वकर्मा यासाठीच सर्वांना पूजनीय आहे. म्हणूनच त्यांची जयंती आजही कामगार साजरी करतात. तो दिवस म्हणजे कन्या संक्रांती — ती १७ सप्टेंबरच्या आसपास येते.

असा हा आदर्श कामगार — त्यांची जयंती १७ सप्टेंबर हा दिवस भारताचा श्रमिक दिन जाहीर व्हावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.

सध्याच्या कामगार दिनाची पार्श्वभूमी

सध्या आपल्या देशात १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळतात. १ मे १८९४ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात कामाचे तास व अन्य मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर केलेल्या गोळीबारात अनेक कामगार ठार झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ सन १८९८ पासून १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. साम्यवादी विचाराने स्थापन झालेल्या सोव्हिएत रशियामध्ये सहभागी झालेल्या देशांसह अन्य काही देशांत व भारतात १ मे हा दिवस पाळतात. मात्र सदर दिवस सर्वच देश पाळत नाहीत.

विविध देशांतील कामगार दिन

देश कामगार दिन
ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर व मार्च महिन्याचा पहिला सोमवार
बांगलादेश १४ एप्रिल
अमेरिका व कॅनडा सप्टेंबर महिन्याचा पहिला सोमवार
जपान २३ नोव्हेंबर — ‘लेबर थँक्स गिव्हिंग डे’
न्यूझीलंड ऑक्टोबर महिन्याचा चौथा सोमवार
त्रिनिदाद व टोबॅगो २४ जून
कझाकिस्तान सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार

१ मे दिनाचे वेगवेगळे उद्देश

ज्या देशांत १ मे हा दिवस पाळला जातो, त्यांचाही उद्देश वेगवेगळा आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये १ मे हा दिवस साम्यवादाचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी प्रतिज्ञा करण्याचा, तर साम्यवादी देशांत भांडवलवाद्यांचे वर्चस्व नाहीसे करण्याचा संकल्प करतात.

असफल साम्यवादी तत्त्वज्ञान

गेली सव्वाशे वर्षे जगात भांडवलशाही आणि साम्यवादी विचारांना प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या अनुयायी देशांनी प्रयत्न केले. साम्यवादाचा मूळ सिद्धांतच हा आहे की, जगात कामगारांचे शोषण हे ज्यांच्याकडे संपत्ती आहे अशा ‘आहेरे वर्गा’कडून ‘नाही रे वर्गा’चे होते. एकेकाळी जगातील १/३ देशांत साम्यवाद्यांचे राज्य होते.

पंडित नेहरूंनी देखील साम्यवादी विचाराने प्रभावित होऊन मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. मोठमोठे सार्वजनिक उद्योग उभारले. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. भारताच्या राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द याच विचारातून आला. साम्यवाद हा शिक्षण, न्याय आदी सर्व माध्यमांतून राबवण्यात आला. त्याचे परिणाम गरिबी, बेकारी, अलगाववाद वाढण्यात झाले — देशाचे सोने विदेशी बँकेत ठेवण्याची वेळ येईपर्यंत.

भारतातील साम्यवादी राज्यांतील कामगारांची स्थिती

भारतातील बंगाल, त्रिपुरा या राज्यांत ३० वर्षे साम्यवाद्यांचे राज्य होते; केरळमध्ये आजही आहे. साम्यवाद्यांनी त्यांचे सर्व प्रयोग या राज्यांत केले. तर कामगारांचे राज्य असलेल्या या राज्यांतील कामगारांची स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत चांगली आहे का? तर उत्तर — नाही!

  • बंगालमध्ये आजही ७ वा वेतन आयोग नाही; उच्च न्यायालयाने आदेश देऊनही केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळत नाही.
  • केरळमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५५ वर्षे आहे.
  • अन्य राज्यांच्या तुलनेत बंगाल व त्रिपुरा या राज्यांत किमान वेतन अत्यंत कमी आहे.
  • कारखाने व उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर बंद झाले आहेत.
  • त्रिपुरात कम्युनिस्ट सरकार असेपर्यंत केवळ पाचवा वेतन आयोग होता.

रशिया व चीन या साम्यवादी देशांनी साम्यवाद केव्हाच सोडला आहे. आम्ही मात्र त्यांच्या विचारांचा १ मे हा दिवस आजही पाळतो. १ मे १८९४ साली अमेरिकेत घडलेल्या घटनेचे दुःख आहे, मात्र भारतात सदर दिवस कामगार दिन म्हणून पाळण्याचे कोणतेही औचित्य नाही.

१७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती — भारताचा राष्ट्रीय श्रमिक दिन घोषित करावा

आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. विविध क्षेत्रांतील गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकल्या जात आहेत. १ मे कामगार दिनाबाबतची वैचारिक गुलामी देखील पुसून टाकण्याची वेळ आली आहे.

भारतीय मजदूर संघ १९५५ पासून १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती हा दिवस राष्ट्रीय श्रमिक दिवस म्हणून साजरा करत आहे. अनेक राज्य सरकारे विश्वकर्मा जयंती साजरी करतात. राजस्थान सरकारने या वर्षी या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली आहे. काही राज्यांत सार्वजनिक सुट्टी दरवर्षी दिली जाते.

आता भारत सरकारने कामगार दिनाची वैचारिक पारतंत्र्याची गुलामगिरी झुगारून, भारतीय संस्कृती, परंपरा व आदर्श यांच्या आधारे १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती भारताचा राष्ट्रीय श्रमिक दिन म्हणून घोषित करावा — असे आवाहन समस्त कामगारांच्या वतीने भारतीय मजदूर संघ भारत सरकारला करीत आहे.